मला आयुष्यामध्ये भरपूर पैसे कमवायचे आहेत, असे निदान सर्वांचेच स्वप्न असते. आणि मग काही लोक ते आपले स्वप्न रोजची नोकरी करता करता विसरुन जातात. तर काही लोक खरंच भरपूर पैसे कमवितात मग त्यासाठी ते एकतर ते आपली जिद्द आणि चिकाटी पणाला लागतात अथवा खोटेपणा अथवा कुणालातरी फसवून भरपूर पैसे कमवितात.

या भरपूर पैसे न कमविलेल्या आणि भरपूर पैसे कमविलेल्या लोकांमध्ये एक अशाही प्रकारची लोक असतात जी पैसे कमविण्याची त्याची जिद्द आणि चिकाटी पणाला लावतात, शक्य त्या सर्व गोष्टी करतात परंतू तरीही पैसे कमवू शकत नाही….. मी त्यातलाच एक.

तसे भरपूर पैसे कमविण्यासाठी कुणाला फसवायचे असते तर मी कधीच पैसेवाला झालो असतो, कारण डोक्यामध्ये एवढ्या भन्नाट कल्पना आहेत की त्या सांगून सगळीकडून पैसा कमविता आला असता. पण चांगले काम करुन देखिल पैसे कमविता येतात, फक्त त्यासाठी तुमची हुशारी आणि ज्ञान योग्य ठिकाणी वापरायला हवे असे मला वाटत होते आणि तेच सुरुवातीपासून करत आलो…. पण अजूनही भरपूर पैसे मिळाले नाहीत.

प्रसिद्धी मिळाल्यावर पैसा आपल्याकडे आपोआप येतो असे वाटायचे म्हणून मग प्रसिद्धी मिळवायची तर मग चांगले काम करुन मिळवूया. म्हणून शक्य तेवढी सर्व चांगली कामे करायला सुरुवात केली. सर्वात चांगले काम म्हणजे ज्ञान वाटण्याचे. माझ्या त्याच प्रयत्नांचे यश म्हणजे अवकाशवेध.कॉम वेबसाइट ज्याद्वारे मला महाराष्ट्र शासनाचे प्रथम बक्षिस देखिल मिळाले आणि सर्टिफिकेट सोबत रुपये सात हजार पाचशेचा चेक घरी आला. तो पर्यंत प्रसिद्धी भरपूर मिळाली होती पण भरपूर पैसा कुठेच नव्हता.

याचा अर्थ असा नाही की अवकाशवेध.कॉम भरपूर पैसे कमविण्याच्या दृष्टीने बनविली. मराठी माणूस हुशार व्हावा हा त्यामागचा उद्देश. दुसर्‍याला शिकवाल तर तुम्ही अधिक शिकाल याच विचाराने लहानपणापासून जे माहित होते ते दुसर्‍यांना शिकवित गेलो. शिक्षण चांगले नसल्याने (पंधरावी पास होण्यासाठी मला ११वेळा परीक्षा द्यावी लागली.) काहीतरी एक क्षेत्र चांगले असायला हवे म्हणून कॉम्प्युटरमध्ये लक्ष केंद्रित करुन करुन बरेच सॉफ्टवेअर कुठलाही कोर्स न करता शिकलो आणि मग सर्वांना मोफत कॉम्प्युटरचे ज्ञान मिळावे यासाठी नंतर सहजच.कॉम वेबसाइट बनविली.

माझे मित्र मला विचारता की तू बाईक (स्कूटर) का विकत घेत नाहीस… त्या सर्वांना एकच कारण सांगतो ते म्हणजे मी आधी गाडी विकत घेणार आणि मग बाईक विकत घेणार. आपल्या इथे एक म्हण आहे, ज्याची फोर व्हीलर (गाडी) असते त्याची आधी टू व्हीलर (बाईक/स्कूटर) असते. मला ती म्हण खोटी ठरवायची आहे. मला आधी फोर व्हीलर आणि मग टू व्हीलर घ्यायची आहे. पण सध्या दिवसेंदिवस बाईक विकत घेणे देखिल महाग होत चालले आहे.

आपण आता जी नेटशिका.कॉम वेबसाइट पाहात आहात ती वेबसाइट सुरु होण्याआधीच मी माझी चांगली नोकरी (इतरांसाठी चांगल्या पगाराची) सोडली आहे. आता वेबसाइटचे क्लास घरी शिकवितो आणि इतरांच्या वेबसाइट बनवून घर चालवितो. पण अजूनही ते भरपूर पैसे कमविण्याचे स्वप्न डोक्यातून जात नाही.

स्वप्न त्यांना नाही म्हणत जी तुम्हाला झोपल्यावर पडतातं तर स्वप्न त्यांना म्हणतात जी एखादी गोष्ट मिळविण्यासाठी तुम्हाला झोपू देत नाही. भरपूर पैसे कमविण्याचे स्वप्न मला अजूनही व्यवस्थित झोपू देत नाही. माझ्या आईला मी बाईक घ्यावे असे अजूनही वाटते तर मी तीला अजूनही आधी आपण गाडी घेऊ असे सांगतो.

तुम्ही कुणालाही विचारा तुम्ही चांगले काम करता का तर ते तुम्हाला त्याच्या चांगल्या कामाचा पाढा वाचून दाखवतील… मला देवजाणे अजूनही भरपूर चांगले काम केले असे वाटत नाही. कारण मी आत्ता पर्यंत बर्‍याच अशा व्यक्ती पाहिल्या आहेत ज्या चांगले काम करतात पण त्यांचे काम कुणाच्याही दृष्टीस पडत नाही असे असले तरी त्यामूळे ते लोक त्यांचे काम थांबवित नाहीत. काही उपयोगी वेबसाइट बनविल्याने काही मोठे काम होत नाही असे मला वाटते. इथे मला माझ्या मनाचा मोठेपणा सांगायचा नाही तर खरंच जेव्हा मी स्वतःलाच विचारतो तेव्हा मला उत्तर मिळते की अजून बरीच कामे करायची आहेत आणि त्यासाठी वेळ फारच कमी आहे. मग मी मोठा श्वास घेत हूश…. असे करतो.

अजून भरपूर चांगल्या चांगल्या मराठी वेबसाइट बनवायच्या आहेत. ऑनलाईन बँकींग, ऑनलाईन शेअरट्रेडींग इ. काही वेबसाइट बनविण्याची कामे गेल्या काही वर्षांपासून पडून आहेत.

गाडी तर मी नक्की घेणार... आज नाही तर निदान पुढील दहा वर्षांमध्ये पण नक्की.

  मागे जाण्यासाठी इथे क्लिक करा.
नेटशिका.कॉमचे हक्क राखिव नाहित आपण यातील माहिती कुठेही वापरु शकता. - सचिन पिळणकर - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.